घरपण
Share
घरपण
हा शब्द ऐकला की प्रत्येकाच्या मनात एक वेगळंच घर उभं राहतं.
कुणाला आजीच्या हातचं वरणभात आठवतो, कुणाला दुपारी अंगणात टाकलेली चटई, तर कुणाला पावसाळ्यात खिडकीजवळ बसून मारलेल्या गप्पा.
पूर्वी घर मोठं होतं म्हणून घरपण होतं असं नाही.
आणि आज घर लहान झालं म्हणून ते हरवलं असंही नाही.
घरपण म्हणजे खरंतर त्या छोट्या छोट्या गोष्टी, ज्या नकळत मनात घर करून बसायच्या.
संध्याकाळ झाली की कोणीतरी देवाजवळ दिवा लावायचं.
टीव्हीवर एकच कार्यक्रम लागायचा, पण सगळे मिळून तोच सोबत बघायचे.
आई ओरडायची, बाबा वर्तमानपत्र वाचत बसायचे, आणि आजी एखादी गोष्ट सांगता सांगता झोपून जायची.
त्या काळात फोटो कमी होते, पण आठवणी खूप होत्या.
सणांचंही तसंच होतं.
सण म्हणजे फक्त तयारी नव्हती, तर “आपलेपणा” असायचा.
चकल्या करताना गप्पा व्हायच्या.
रांगोळी काढताना सगळ्यांचे सल्ले यायचे.
कोणीतरी फुलं आणायचं, कोणीतरी आरास करायचं.
कामं वाटून घेतली जायची, पण आनंद मात्र सगळ्यांचा असायचा.
आज वेळ बदलली आहे.
घरांची रचना बदलली, आयुष्याचा वेग बदलला, जबाबदाऱ्या बदलल्या.
पण मन अजूनही त्या साध्या क्षणांना शोधत राहतं.
कारण घरपण हे भिंतींमध्ये नसतं.
ते माणसांच्या उपस्थितीत असतं.
घरी उशिरा आलं की वाट बघण्यात असतं.
आणि सण आले की “यावेळी सगळे भेटणार ना?” या एका प्रश्नात असतं.
कधी कधी वाटतं, आपण सगळे पुन्हा त्या भावनेकडे परत चाललोय.
थोडं हळू जगण्याकडे.
थोडं एकत्र सण साजरा करण्याकडे.
आणि पुन्हा एकदा घराला फक्त जागा न मानता, भावना मानण्याकडे.
घरपण कदाचित पूर्णपणे कधीच हरवत नाही.
ते फक्त एखाद्या जुन्या गाण्यासारखं मनाच्या कोपऱ्यात शांत बसलेलं असतं.
आणि मग पहिल्या पावसात आलेला मातीचा सुगंध, सोबत सणांची चाहूल आणि आपल्या माणसांची एक भेट हे सोबत घेऊन येत.
कलाव्य तुम्हाला हेच घरपण पुन्हा घरी आणण्यात मदत करू पाहतंय.
आईने प्रेमाने बनवलेल्या सुंदर नैवेद्यासाठी, तितकंच सुंदर नैवेद्याचं पान.
“यंदाचं डेकोरेशन काय?” या प्रश्नाचं पारंपरिक पण मनाला भिडणारं उत्तर — पैठणीचं सुंदर डेकोरेशन.
औक्षणाच्या त्या खास क्षणांसाठी पैठणी पूजा थाळी.
इतकंच नाही तर या सगळ्यासोबत…
एक मायेची ऊब.
जी फक्त घर सजवत नाही,
तर घराला पुन्हा घरपण आणते.